मुर्तिजापूर - तालुक्यातील शिरताळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महंत १००८ सिताराम महाराज यांच्या कृपेने व श्री वै. समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त 'श्रीमद् भागवत कथा व हरिनाम सप्ताहा'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. गुरुवर्य तुकाराम सखारामपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह हनुमान मंदिर, शिरताळा येथे पार पडणार आहे. या आध्यात्मिक महोत्सवाचा शुभारंभ शनिवार, ९ मे २०२६ (वैशाख कृ. ७) रोजी होणार असून, सांगता शनिवार, १६ मे २०२६ (वैशाख कृ. ३०) रोजी होईल. सप्ताहाचे व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज कळंबेश्वर हे करणार आहेत. कथेची वेळ दररोज सकाळी ८:३० ते १२:३० पर्यंत आहे. याशिवाय दररोज पहाटे ५ वाजता काकडा आरती, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ आणि रात्री ८ ते १०:३० या वेळेत विविध नामांकित कीर्तनकारांची 'हरिकीर्तन' सेवा पार पडणार आहे. सप्ताहात ह.भ.प. सोपान महाराज डिक्कर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज लाहुळकर, ह.भ.प. गजानन महाराज गोडचारे, ह.भ.प. हिरओम सोनोणे महाराज, ह.भ.प. गणेश कराळे महाराज, आणि ह.भ.प. अविनाश महाराज खोकले आपली सेवा अर्पण करतील. शुक्रवार, १५ मे रोजी भव्य मिरवणूक सोहळा काढण्यात येईल. शनिवार, १६ मे रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत ह.भ.प. गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. या महाप्रसादाचे अन्नदाते श्री लखन खेमराजी यादव हे आहेत.या धार्मिक कार्यक्रमाला समस्त पंचक्रोशीतील भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकऱ्यांनी केले आहे.
0 टिप्पणियाँ