; राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा घेतला सविस्तर आढावा
प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूम अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्र माना, व आयुर्वेदिक दवाखाना ता. मूर्तिजापूर येथे जिल्हा परिषद अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी आज भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान उपकेंद्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, नोंदी, औषधसाठा तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची तपासणी करण्यात आली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर कराळे, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जलजन्य व कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, असंसर्गजन्य आजारांच्या तपासण्या व उपचार, विविध आरोग्य पोर्टलवरील नोंदी, 'माझं गाव – आरोग्य संपन्न गाव' अभियानाची अंमलबजावणी, स्वच्छता अभियान, पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाची व्यवस्था, औषध व आवश्यक साहित्याचा साठा, आरोग्य शिक्षण विषयक साहित्य तसेच आरोग्य शिक्षण पद्धती आरोग्य शिक्षणाबाबत सोशल मीडियाचा वापर .कुटुंब नियोजन कार्यक्रम तसेच शस्त्रक्रियांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
याशिवाय उपकेंद्र परिसरातील हर्बल गार्डनची पाहणी करून त्याची देखभाल,आणि परिसराची स्वच्छता याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक सुविधा व नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. उपकेंद्रातील स्वच्छता, नोंदींची शिस्त, राष्ट्रीय कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि कर्मचारी वर्गाची कार्यपद्धती याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून संपूर्ण आरोग्य पथकाचे कौतुक केले.
या भेटीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी प्रेरणा मिळाली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम आणि परिणामकारक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.
0 टिप्पणियाँ