अकोला - अकोला येथील रहिवासी मो. इस्माईल हबीबभाई कच्छी आणि इतर नागरिकांनी प्रशासनाला एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी SIR मतगणनेच्या फॉर्म भरण्याच्या अंतिम मुदतीमध्ये सहा महिन्यांची वाढ करण्याची आणि फॉर्ममधील जाचक अटी कमी करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०२६ आहे. मात्र, सध्या अकोला महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू असून, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ मिळतो. याच धर्तीवर, सर्वसामान्य नागरिकांनाही आवश्यक कागदपत्रे आणि जात वैधता प्रमाणपत्र गोळा करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळायला हवी. निवेदनामध्ये सध्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असून कागदपत्रे गोळा करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे अंतिम तारीख ३०/०७/२०२६ वरून पुढील ६ महिने वाढवण्यात यावी.वेबसाईटची समस्या: जन्म-मृत्य विभागाची अधिकृत वेबसाईट अनेकदा बंद असते. त्यामुळे नागरिकांना कागदपत्रे मिळवण्यात अडचणी येत आहेत, यावर तोडगा काढून अटी शिथिल कराव्यात.नावातील चुका दुरुस्त करणे: ज्या नागरिकांच्या कागदपत्रांमध्ये नावाच्या चुका आहेत आणि त्यांनी गॅझेट (राजपत्र) करून नाव दुरुस्त केले आहे, त्यांचे गॅझेटनुसार असणारे नाव फॉर्ममध्ये ग्राह्य धरण्यात यावे. गॅझेट केलेल्या नावांना निवडणूक आयोगाने मान्यता न देणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या जाचक अटींमुळे आणि कमी मुदतीमुळे अकोल्यातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने तात्काळ मुदतवाढ देऊन अटी सोप्या कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते इस्माईलभाई टिव्हीवाले, घनश्याम भटकर, अमजद खान, बाबा सेठ, जाकिर खान पठाण, सखावत शहा, राजू पठाण, आसिफ खान, युसूफ खान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ