" मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन
🛑
_भूलथापांना बळी पडू नये_
अकोला, दि. ३० : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी करणे आवश्यक होते. ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे योजनेअंतर्गत मिळणारे लाभ बंद करण्यात आले आहेत.
ई-केवायसी संदर्भात शासनाकडून किंवा महिला व बाल विकास विभागाकडून कोणतेही नवीन निर्देश अथवा अद्ययावत माहिती प्राप्त झाल्यास ती अधिकृत माध्यमांद्वारे तसेच वर्तमानपत्रांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल.
मात्र, काही व्यक्ती लाभार्थी महिलांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. *_"३०० रुपये भरून ऑनलाइन तक्रार दाखल करावी लागते, ती तक्रार मंत्रालयात पाठविली जाते व त्यानंतर लाभ पुन्हा सुरू होतात"_* अशा प्रकारच्या खोट्या आश्वासनांद्वारे महिलांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे लाभार्थी महिलांनी अशा कोणत्याही अफवा, भूलथापा किंवा अनधिकृत व्यक्तींच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये. कोणालाही पैसे देऊ नयेत तसेच आपली आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.
लाभार्थ्यांनी केवळ शासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा व कोणतीही शंका असल्यास संबंधित महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे.
०००
0 टिप्पणियाँ