सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अकोट येथे मेगा MSME क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम उत्साहात संपन्न
₹59.14 कोटींच्या कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण
अकोला, दि. १६ मे : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अकोला प्रादेशिक कार्यालयामार्फत हॉटेल श्रीहरी फूड पार्क, अकोट येथे “मेगा MSME क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम” उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास अकोट व परिसरातील MSME उद्योजक तसेच व्यावसायिक बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याचबरोबर अकोला विभागातील जिल्हा मुख्यालय शाखांमध्येही एकाचवेळी MSME मेगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गोरक्षण रोड शाखा, अकोला, बुलढाणा शाखा, बुलढाणा तसेच वाशिम शाखा, वाशिम येथे कार्यक्रम पार पडले.
अकोट येथील कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री. सुधीर थेटे, जिनिंग व प्रेसिंगचे अध्यक्ष श्री. प्रमोद चांडक, MIDC अकोटचे प्रतिनिधी तसेच जिनिंग अँड प्रेसिंग, दाल मिल व ऑइल मिल उद्योग क्षेत्रातील अनेक प्रमुख उद्योजक उपस्थित होते.
जिल्हा अग्रणी प्रबंधक, अकोला श्री. नयन सिन्हा तसेच मुख्य प्रबंधक, कर्ज विभाग, अकोला श्री. सर्फराज आलम यांनी उपस्थित उद्योजकांना बँकेच्या विविध MSME योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
हा कार्यक्रम अकोट शाखेचे शाखा प्रबंधक श्री. स्वप्निल इंगळे व बँक सहकारी यांनी आयोजित केला. कार्यक्रमाला अकोट तसेच आजूबाजूच्या शाखांमधील कर्मचारी व ग्राहकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हा कार्यक्रम अकोला विभागाचे प्रादेशिक प्रमुख श्री. पंकज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात सुमारे १८५ उद्योजकांनी सहभाग नोंदविला. यावेळी बँकेच्या विविध MSME योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच लाभार्थ्यांना ₹59.14 कोटींच्या कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उद्यम नोंदणी, सी-केवायसी, सामाजिक सुरक्षा योजना, डिजिटल बँकिंग सेवा तसेच विविध कर्ज योजनांविषयी माहिती देण्यासाठी विशेष स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलला उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून मार्गदर्शन केले.
यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही MSME उद्योजकांच्या प्रगतीसाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले.
उद्योजकांना जलद, सुलभ व त्रासमुक्त कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँक कटिबद्ध असून विविध व्यवसायांच्या गरजेनुसार आकर्षक MSME कर्ज योजना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नवउद्योजक तसेच विद्यमान उद्योगांच्या विस्तारासाठी बँकेमार्फत आवश्यक आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन व तत्पर सेवा दिली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान उद्योजकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद व सक्रिय सहभाग दिसून आला. या उपक्रमातून MSME क्षेत्राच्या विकासासाठी व प्रादेशिक आर्थिक प्रगतीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली.
0 टिप्पणियाँ