जागतिक तंबाखू विरोधी दिन : तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प करूया
दरवर्षी 31 मे रोजी जगभरात *जागतिक तंबाखू विरोधी दिन* (World No Tobacco Day) साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या पुढाकाराने साजरा होणाऱ्या या दिनाचा मुख्य उद्देश तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आणि तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांना प्रेरित करणे हा आहे.
तंबाखूमध्ये निकोटीनसह अनेक घातक रसायने असतात. बीडी, सिगारेट, गुटखा, पानमसाला, हुक्का अशा विविध स्वरूपांत तंबाखूचे सेवन केले जाते. या व्यसनामुळे फुफ्फुसांचा, तोंडाचा व घशाचा कर्करोग, हृदयविकार, उच्च रक्तदाब, श्वसनविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. तसेच गर्भवती महिलांच्या आरोग्यावर आणि गर्भाच्या विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. तंबाखूचे व्यसन केवळ आरोग्यालाच नव्हे तर कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनालाही हानी पोहोचवते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक तरुण विविध कारणांनी तंबाखूच्या आहारी जात आहेत. त्यामुळे तंबाखूविरोधी जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. या निमित्ताने *तंबाखूमुक्त शाळा, तंबाखूमुक्त कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करणे* यांसारखे संकल्प प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
तंबाखूमुक्त जीवनाचे अनेक फायदे आहेत. तंबाखूचा त्याग केल्याने शरीर निरोगी राहते, श्वसनक्रिया सुधारते, हृदयविकाराचा धोका कमी होतो, आर्थिक बचत होते तसेच जीवनमान आणि आयुर्मान वाढण्यास मदत होते. व्यक्तीचे आरोग्य सुधारल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजावरही होतो.
भारत सरकारने लागू केलेला *"सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ (जाहिरातींवर बंदी व व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरणाचे नियमन) अधिनियम, 2003" (COTPA-2003)* हा तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती, विक्री, वितरण आणि वापरावर नियंत्रण ठेवणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे. या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू उत्पादने विक्रीस बंदी, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू विक्रीस मनाई तसेच तंबाखू उत्पादनांच्या पॅकेटवर आरोग्यविषयक चेतावणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तंबाखूमुक्त समाज घडविण्यासाठी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे.
तंबाखू हे केवळ वैयक्तिक आरोग्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी घातक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः तंबाखूपासून दूर राहून इतरांनाही त्यापासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून निरोगी, सुरक्षित आणि तंबाखूमुक्त जीवन जगण्याचा दृढ संकल्प करण्याची संधी आहे.
"तंबाखूला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार" हा संदेश प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे.
बाळासाहेब घुगे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला
0 टिप्पणियाँ