सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 'मेगा कृषी कर्ज मेळावा'
शेतकऱ्यांना मार्गदर्शन व कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण
अकोला, दि. ७ :
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अकोला विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 'देशव्यापी मेगा कृषी कर्ज पोहोच कार्यक्रम' शनिवारी औद्योगिक वसाहतीतील हॉटेल बारोमासी येथे झाला. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू शेतकरी बांधवांना कृषी कर्ज वितरणाचा लाभ मिळावा, असे निर्देश खासदार श्री. धोत्रे यांनी यावेळी दिले.
’बियाण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत - शेतकरी समृद्धी, बँक प्रगती' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेल्या या विशेष मेळाव्यात शेकडो शेतकरी, कृषी उद्योजक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अकोला क्षेत्रीय प्रमुख पंकज कुमार यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि बँकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
या प्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य कार्यालयाचे डीजीएम दिलीप बरनवाल आणि नयन सिन्हा यांनी बँकेच्या पत धोरणांविषयी मार्गदर्शन केले.
विविध बँकिंग योजनांचे सादरीकरण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. मेळाव्यात शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
बँकेच्या विविध महत्त्वाच्या कर्ज योजना, पीक कर्ज, आणि कृषी पूरक व्यवसायांसाठी मिळणाऱ्या अनुदानांविषयी सरफराज आलम यांनी अत्यंत सोप्या भाषेत सविस्तर मार्गदर्शन केले.
उपविभागीय कृषी अधिकारी विवेक बिऱ्हाडे यांनी शासकीय कृषी योजना आणि बँकिंग क्षेत्राच्या समन्वयावर भर दिला.
कृषी विज्ञान केंद्राचे संचालक उमेश ठाकरे यांनी 'बियाण्यांपासून ते थेट बाजारापर्यंत' आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याचे उत्तम मार्गदर्शन केले.
एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनचे सचिव नितीन बियाणी यांनी कृषी-पूरक उद्योगांना एमआयडीसी अंतर्गत मिळणाऱ्या संधींवर प्रकाश टाकला.
अकोला इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, अकोला डाळ मिल असोसिएशनचे शांतीलाल भाल
यांनी अकोल्यातील स्थानिक उद्योग आणि शेती यांच्यातील साखळी मजबूत करण्यासाठी बँकेने घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक केले.
या महा-मेळाव्या दरम्यान बँकेच्या वतीने अनेक शेतकरी, नवउद्योजक, कृषी क्लस्टर्सचे सदस्य, सीए आणि डीएसए यांना कोट्यवधी रुपयांच्या कर्ज मंजुरी पत्रांचे थेट वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन निलेश मुंधेकर यांनी केले.
०००
0 टिप्पणियाँ