*विधी संघर्षग्रस्त बालकांसंदर्भात पोलिस मार्गदर्शिकेचे विमोचन --- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची उपस्थिती*
*प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे यांनी कार्यक्रमाप्रसंगी माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडतात, असे सांगतानाच बाल न्यायमंडळाने तयार केलेल्या या पुस्तिकेचे रेखाटन आणि विशेष बाल पोलिस पथकाला न्यायमंडळासोबत करावयाच्या प्रक्रियांची माहिती मराठीमध्ये असल्यामुळे उपयुक्त होईल, असे गौरवोद्गार काढले.*
अकोला: विधी संघर्षग्रस्त बालकांसंदर्भात पोलिस मार्गदर्शिकेचे विमोचन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे यांच्याहस्ते करण्यात आले.
बाल न्यायमंडळाच्या अध्यक्षा स्मिता बन्सोड, सदस्या अॅड. अनिता गुरव -शिंदे व सदस्य अॅड. संजय सेंगर यांच्या अथक परिश्रमातून पोलिसांचा बालकांसोबत असलेला बालस्नेही व्यवहार, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व महाराष्ट्र नियम 2018 मधील मार्गदर्शक तत्वे व तरतुदींचा अवलंब करून विशेष बाल पोलिस पथकाची भूमिका, जबाबदारी व कर्तव्य याबाबत मराठीमध्ये मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. बालकांना संविधानामध्ये मिळालेल्या अधिकाराचा तसेच बाल हक्क संहितामध्ये बालकांना दिलेल्या हक्कांचा या मार्गदर्शिकेमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या पोलिस मार्गदर्शिकेचे विमोचन नुकतेच बाल न्यायमंडळ, अकोला येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव स्वरुप बोस, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे,उपविभागीय पोलिस अधिकारी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती स्मिता बन्सोड यांनी केले. संचालन अॅड. अनिता गुरव-शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन अॅड. संजय सेंगर यांनी केले. कार्यक्रमाला बालकल्याण समिती, विशेष बाल पोलिस पथकाचे कर्मचारी, पोलिस अधिकारी तसेच विधी व परिविक्षा अधिकारी श्रीमती संगिता कोंडाणे आदि उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.
0 टिप्पणियाँ